belgaum

सत्तांतराचा नवा अध्याय: १९ नव्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकच्या राजकारणात सत्तांतर आणि अंतर्गत समीकरणांची धुमसती शेगडी पुन्हा एकदा पेटली आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे डी. के. शिवकुमार यांच्याकडे आल्यानंतर, त्यांच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या विस्ताराचा सोहळा आज बंगळुरू येथील लोकभवनात पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी १९ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला व्यासपीठावर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजधानी बंगळुरू येथील राजभवनात (लोकभवन) आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सोहळ्यात कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. एकूण १९ नव्या मंत्र्यांनी अधिकृतपणे पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यापूर्वीच डी. के. शिवकुमार यांच्यासोबत १३ ज्येष्ठ मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. आजच्या १९ मंत्र्यांच्या समावेशामुळे मंत्रिमंडळातील एकूण संख्या ३३ वर पोहोचली आहे.

या विस्तारात डॉ. अजय धर्मसिंग, एच. सी. बालकृष्ण, के. एस. बसवंतप्पा, बसवराज रायरेड्डी, एन. चेलुवरायास्वामी, लक्ष्मण सवदी, मधू बंगारप्पा, एस. एस. मल्लिकार्जुन, डी. नागेंद्र, पी. एम. नरेंद्रस्वामी, पुट्टुरंग शेट्टी, टी. रघुमूर्ती, रिझवान अर्शद, रुद्रप्पा लमाणी, संतोष लाड, के. एम. शिवलिंगेगौडा, शिवराज संगडगी, विजयानंद काशप्पनावर आणि बी. झेड. जमीर अहमद खान या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक नेत्यांनी ईश्वर, महापुरुष आणि आईच्या नावाने शपथ घेत प्रशासनाला गती देण्याचा संकल्प व्यक्त केला.

 belgaum

सोहळा थाटामाटात पार पडला असला, तरी राजभवनाच्या भिंतींआड सुरू असलेला काँग्रेस पक्षांतर्गत असंतोष आता थेट रस्त्यावर आला आहे. या विस्तारात एकाही महिला आमदाराला थेट शपथ घेऊ न दिल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ३४ सदस्यांच्या क्षमतेच्या मंत्रिमंडळात अद्याप एक जागा प्रलंबित ठेवण्यात आली आहे. हे पद एका महिला आमदाराला देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या एका जागेसाठी काँग्रेस पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. बेळगावच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे होते. राजकीय पातळीवर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार या दोघांनीही लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाची शिफारस हायमांडकडे केली होती. याशिवाय विधान परिषदेच्या ज्येष्ठ नेत्या उमाश्री आणि गायत्री यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, गायत्री यांच्या नावावरून पक्षात आणि स्थानिक पातळीवर तीव्र वाद-विवाद सुरू झाले, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले.

लक्ष्मी हेब्बाळकर यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ हेब्बाळकर समर्थकांनी बंगळुरू आणि बेळगाव येथे रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलने केली आणि त्यांना तात्काळ मंत्रिपद देण्याची आक्रमक मागणी लावून धरली. दुसरीकडे, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही महिला नेत्यांमधील अंतर्गत वाद आणि गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेस हायमांड एका वेगळ्याच रणनीतीवर विचार करत आहे. या तिन्ही महिला नेत्यांना बाजूला सारून पक्षातील निष्ठावंत नेते एन. एस. बोसराजू यांना हे प्रलंबित मंत्रिपद देण्याची तयारी उच्च पातळीवर सुरू असल्याचे समजते.

या राजकीय संघर्षात आणखी एक नवे वळण म्हणजे, काँग्रेसमधील किंगमेकर आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यासाठी आणि आपल्या गटासाठी आणखी एका मंत्रिपदाची मागणी वारंवार लावून धरली आहे. आता हायमांड या वादावर पडदा टाकण्यासाठी बोसराजू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करते, की समर्थकांच्या दबावापुढे झुकून लक्ष्मी हेब्बाळकर किंवा इतर महिला आमदाराला मंत्रिमंडळात संधी देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.