belgaum

टिळकवाडीत दुर्मिळ ‘उडता सर्प’ आढळला!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : घनदाट जंगलातही क्वचितच आढळणारा दुर्मिळ उडता सोनसर्प (Ornate Flying Snake) चक्क बेळगाव शहरातील टिळकवाडी परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोमवार पेठ, टिळकवाडी येथील गलगंची अपार्टमेंटच्या संरक्षक भिंतीवरील ग्रिलवर हा साप सरपटताना दिसला. माहिती मिळताच सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी घटनास्थळी धाव घेऊन सापाला सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची व्यवस्था केली.

साधारणपणे सहा फूट लांबीपर्यंत वाढणारा हा साप शरीरावर सोनेरी, काळसर आणि लालसर रंगांच्या आकर्षक नक्षीमुळे सहज ओळखला जातो. झाडांवर राहणारा हा साप शरीर सपाट करून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तब्बल 100 मीटरपर्यंत घसरत जातो. त्यामुळे तो हवेत उडत असल्याचा भास निर्माण होतो.

 belgaum

पक्षी, पाली, सरडे आणि बेडूक हे या सापाचे मुख्य खाद्य असून मादी साप साधारण दहा अंडी घालते. हा साप सौम्य विषारी (Mildly Venomous) असला तरी त्याचे विष माणसासाठी धोकादायक नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.

यापूर्वी 2019 मध्येही आनंद चिट्टी यांनी शुक्रवार पेठ परिसरातून याच प्रजातीचा साप पकडला होता. टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो परिसरात पुन्हा हा दुर्मिळ साप आढळल्याने हा परिसर आजही समृद्ध जैवविविधतेचा वारसा जपून असल्याचे अधोरेखित झाले आहे. हा नैसर्गिक ठेवा जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन आनंद चिट्टी यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.