belgaum

SIR मोहिमेत कन्नडसोबत मराठी फॉर्म द्या; किरण जाधव यांची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: भारत सरकार आणि निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक प्रक्रियेतील अर्ज कन्नडसोबत मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाचे नेते तथा भाजप नेते किरण जाधव यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन केली.

सोमवारी (६ जुलै) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात किरण जाधव यांनी सांगितले की, बेळगाव हा सीमाभाग असून येथे अनेक वर्षांपासून मराठी आणि कन्नड भाषिक नागरिक सलोख्याने वास्तव्यास आहेत. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिकांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले असल्याने सध्या सुरू असलेल्या SIR मोहिमेतील केवळ कन्नड भाषेतील फॉर्म समजून घेणे आणि भरणे अनेक मराठी भाषिक मतदारांसाठी कठीण ठरत आहे.

त्यामुळे प्रशासनाने कन्नड फॉर्मच्या मागील बाजूस (बॅक साईड) मराठी भाषेतील मजकूर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे मराठी भाषिक मतदारांना अर्ज भरणे सोपे होईल. तसेच बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांनाही अर्ज भरून घेण्याचे काम अधिक सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

 belgaum

यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाची दखल घेत, हा विषय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल आणि मराठी भाषिकांच्या सोयीच्या दृष्टीने सकारात्मक पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती किरण जाधव यांनी दिली.

दरम्यान, किरण जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या SIR मोहिमेचे स्वागत केले. दुबार मतदानाला आळा घालण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगत, बेळगावातील नागरिक या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी फॉर्मची मागणी केल्यानंतर आता सकल मराठा समाज आणि भाजप नेते किरण जाधव यांनीही मराठी भाषेतील फॉर्म उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.