belgaum

सातत्याने पाऊस; गोकुळ नगर क्रॉस-6 परिसर जलमय, रहिवाशांची गैरसोय

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर आणि परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे गोकुळनगर क्रॉस क्र. 6 (गुड शेड रोड) आणि चैतन्य टेक्नो स्कूलजवळील परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून स्थानिक रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाली आहे.

गोकुळनगर क्रॉस क्र. 6 (गुड शेड रोड) आणि चैतन्य टेक्नो स्कूलजवळील परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे रोजच्या कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली आहे.

पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून वाहने चालवावी लागत असल्याने दुचाकी वाहन चालकांच्या बाबतीत अपघाताचा धोका वाढला आहे. या ठिकाणी अनेक वाहनचालक विशेषतः दुचाकीस्वार गती कमी करून सावधपणे मार्ग काढताना दिसत आहेत; पाणी भरलेला रस्ता ओलांडताना काहींची दुचाकी वाहने नादुरुस्त होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

 belgaum

पाणी निचऱ्यासाठी आवश्यक गटारी नाल्याची व्यवस्थित देखभाल केली जात नसल्यामुळे पावसाळ्यात सदर ठिकाणी ही समस्या उद्भवत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या या पूरसदृश्य परिस्थितीमुळे वृद्ध नागरिक व लहान मुले असलेल्या कुटुंबांना विशेष त्रास होतो आहे.

शाळानिकट असली तरी पालकांना मुलांच्या सुरक्षेची काळजी लागून राहिलेली असते. चैतन्य टेक्नो स्कूलकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचल्याने विद्यार्थी आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांची वहिवाट प्रभावित होत असते. गोकुळ नगर भागात राहणाऱ्या काही लोकांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत पावसाळ्यांमध्ये हाच प्रकार वारंवार होतो. तथापी समस्येचे दीर्घकालीन निराकरण झालेले नाही. अनेकांनी परिसरातील ड्रेनेज व गटार साफसफाईचे काम वेळोवेळी करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हे दुर्लक्ष आणि ठोस उपाय न झाल्याने सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास कारणीभूत ठरत आहे. या परिस्थितीमुळे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत; रात्रीच्या वेळी पाण्यात दडलेले गटारे किंवा उखडलेले रस्ते अधिक घातक ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी प्रशासनाला तत्काळ लक्ष वेधून या भागात तातडीने ड्रेनेज व्यवस्था तपासून नाल्यांची साफसफाई, तात्पुरती पाण्याचे वहन सुकर करणारी उपाययोजना व दीर्घकालीन पाणी निर्गमन योजनेवर काम करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.