बेळगाव लाईव्ह: गेल्या तीन दिवसांपासून शेजारील महाराष्ट्रातील घाटमाथा तसेच बेळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण तयारीत राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ते बोलत होते.नदीकाठच्या भागात पाण्याची पातळी वाढत असल्याने पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी नागरिक आणि जनावरांच्या हालचालींवर तातडीने निर्बंध घालून पोलीस विभागाच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पूरस्थिती उद्भवल्यास नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी बोटींची व्यवस्था तयार ठेवावी. एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाने २४ तास सज्ज राहावे. तहसीलदारांनी एसडीआरएफशी सातत्याने समन्वय राखून आवश्यक माहिती तातडीने द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा तसेच तालुका स्तरावर त्वरित मदत केंद्र (हेल्पलाइन) सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील धोकादायक व जीर्ण घरे ओळखून तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी ठेवावी. तसेच अंशतः व पूर्णपणे नुकसान झालेल्या घरांचे सर्वेक्षण करून जनावरांच्या चाऱ्याची कमतरता भासू नये याचीही काळजी घेण्यास सांगितले.
जिल्ह्यात अतिवृष्टीच्या परिस्थितीत नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी ओळखण्यात आलेल्या ३९७ निवारा केंद्रांतील सुविधांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असल्याने तेथील धरणांतून पाणी सोडले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याची नियुक्ती करून नियमित माहिती घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पावसामुळे पसरणाऱ्या साथीच्या रोगांबाबत जनजागृती करावी, पूरग्रस्त भागांसाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा तसेच डेंग्यू तपासण्यांचा आढावा घेऊन पिण्यास अयोग्य पाण्याचे स्रोत बंद करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाव्य पूरस्थितीत बचावकार्यासाठी जिल्ह्यात एसडीआरएफच्या ५, अग्निशमन विभागाच्या ९ आणि तालुका स्तरावरील २७ अशा एकूण ४१ बोटी उपलब्ध आहेत. तसेच नागरिकांच्या स्थलांतरासाठी ३९७ निवारा केंद्रे आणि १२९ गोशाळा शिबिरे निश्चित करण्यात आली आहेत.
या बैठकीला भूषण बोरसे, के. रामराजन, आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी रोहित सिंह यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.




