belgaum

काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा राडा !

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील आरटीओ कार्यालय समोरील काँग्रेस भवनात सोमवारी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान प्रचंड गदारोळ उडाला. विविध गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार वादानंतर या बैठकीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.

जिल्हाध्यक्षपदासाठी तीव्र चुरस निर्माण झाल्याने वेगवेगळ्या गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधी शाब्दिक बाचाबाची झाली आणि पाहतापाहता वातावरण पूर्णपणे बिघडले. विशेष म्हणजे, ज्या वेळी हा प्रकार घडला, त्या बैठकीत स्थानिक आमदार आसीफ सेठ हे देखील उपस्थित होते. या गोंधळादरम्यान माजी आमदार रमेश कुडची यांचे समर्थक आणि इतर कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यादरम्यान, रमेश कुडची यांचे समर्थक हेमंत लेंगडे यांच्यावर काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळ काँग्रेस कार्यालयात तणावाचे व आक्रमक वातावरण पाहायला मिळाले. मात्र, उपस्थित ज्येष्ठ नेत्यांनी तत्काळ मध्यस्थी करून परिस्थिती आटोक्यात आणली आणि वातावरण शांत केले.

 belgaum

अहमदाबाद येथील एआयसीसीअधिवेशनातील निर्णयानुसार, तळागाळापासून पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी यांच्या मोहिमेच्या धर्तीवर कार्यकर्ते, तसेच ब्लॉक, बूथ आणि जिल्हा पंचायत अध्यक्षांचे विचार व अभिप्राय मागवून नेत्यांची निवड करण्याची प्रक्रिया बेळगाव जिल्ह्यात यशस्वीपणे राबवली जात आहे, असे आमदार आसीफ सेठ यांनी सांगितले.

पक्षात कसलाही मोठा वाद किंवा भांडण झाले नाही, तर केवळ आपापले मत व्यक्त करताना किरकोळ चर्चा आणि वाद झाले इतकेच, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, निष्ठावान कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनोज चौहान यांनी योग्य उत्तरे दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकिकडे पक्षात अंतर्गत गटबाजी नसल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत असले, तरी अशी मतांतरे बैठका आणि निवडणुकीच्या दरम्यान सख्ख्या चव्हाट्यावर आल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. जिल्हाध्यक्ष पदासाठी वाढलेली चुरस पाहता या पदावर नक्की कोणाची वर्णी लागणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.