बेळगाव लाईव्ह: दिल्ली येथे शिक्षण सुधारणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सोमवारी बेळगावात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. विविध सामाजिक, विद्यार्थी आणि नागरिक संघटनांच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पंतप्रधानांच्या नावे तयार करण्यात आलेले निवेदन तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सर्वंकष सुधारणांची मागणी केली. नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी आणि इतर परीक्षा गैरव्यवहारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली.

तसेच, शांततापूर्ण आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत, केंद्र सरकारने त्यांच्याशी तातडीने संवाद साधावा, अशी मागणीही करण्यात आली.
शिक्षण क्षेत्रात न्याय, समान संधी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या मागण्यांचा आदर करण्याचे आवाहनही यावेळी केले.





