belgaum

शेतकरी प्रश्नांवर भाजपचा काँग्रेसविरोधात मोर्चा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: राज्यभर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना काँग्रेस सरकारमधील मंत्रीपदाच्या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने बेळगावात निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी, राज्यातील शेतकरी गंभीर संकटात असताना काँग्रेसचे नेते दिल्लीच्या राजकारणात आणि मंत्रीपदाच्या शर्यतीत व्यस्त असल्याची टीका केली. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पीएम-किसान योजनेतील ६ हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य सरकारने पूर्वीप्रमाणे ४ हजार रुपयांची मदत पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

भाजपने निवेदनात बेळगाव जिल्ह्याला तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून पिकांच्या नुकसानीबद्दल योग्य भरपाई द्यावी, अशी प्रमुख मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करावा, लोडशेडिंग बंद करावे, वेळेवर दर्जेदार बियाणे व खतांचा पुरवठा करावा आणि निकृष्ट बियाणे व खतांच्या विक्रीवर कठोर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.

 belgaum

याशिवाय, निवडणूक आश्वासनानुसार संपूर्ण कृषी कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, ‘रायत विद्यानिधी’ आणि पीएम-किसान योजनेतील राज्य सरकारची अतिरिक्त ४ हजार रुपयांची मदत पुन्हा सुरू करावी, कृषी ट्रान्सफॉर्मरवरील अनुदान पूर्ववत करून वाढीव दर मागे घ्यावेत आणि वीजटंचाई दूर करावी, अशीही मागणी करण्यात आली.

तसेच दुष्काळ व्यवस्थापनासाठी तलावांचे गाळ काढण्याची कामे तातडीने हाती घ्यावीत, कृषी व फलोत्पादन विभाग अधिक सक्रिय करून पर्यायी पिकांचे बियाणे, खते, पीकविमा, ठिबक सिंचन, चारा बँक आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना युद्धपातळीवर राबवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी काँग्रेस सरकारच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.