belgaum

कचऱ्यामुळे जलवाहिन्या तुंबल्या; नगरसेवक, आमदारांची धाव, मदतकार्य सुरू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह|
पहिल्याच मुसळधार पावसात बेळगावच्या शिवाजीनगर–पंजी बाबा, किल्ला तलाव परिसरात पुन्हा पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली. जलवाहिन्या, गटारी आणि ड्रेनेजमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर कचरा अडकल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा थांबला आणि अनेक रस्ते तसेच काही घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ तसेच स्थानिक नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून जलवाहिन्या, गटारी आणि ड्रेनेजमध्ये अडकलेला प्लास्टिक व इतर कचरा तातडीने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी पंपाच्या साहाय्याने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

यावेळी अमान सेठ यांनी सांगितले की, परिसरातील ड्रेनेज सुधारणा काम सुरू असताना कंत्राटदाराकडून झालेल्या विलंबामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी २४ तास आवश्यक उपाययोजना राबविल्या जातील.

 belgaum

नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनीही गटारी आणि जलवाहिन्यांची नियमित साफसफाई होणे अत्यावश्यक असल्याचे सांगत, भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.

दरम्यान, नागरिकांनीही नाले, तलाव आणि गटारींमध्ये प्लास्टिक व घरगुती कचरा टाकू नये, असे आवाहन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केले. स्थानिकांच्या मते, प्रशासनाची नियमित साफसफाई आणि नागरिकांचे सहकार्य या दोन्ही गोष्टी झाल्यासच पंजी बाबा परिसरातील दरवर्षीची पाणी तुंबण्याची समस्या कायमची सुटू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.