बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील जामगाव येथे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठे झाड कोसळून विद्युत खांब व वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे जामगाव परिसरातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे खंडित झाला असून संपूर्ण गाव अंधारात आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र दोन दिवस उलटूनही हेस्कॉम विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अभ्यास करणे कठीण झाले आहे. मोबाईल चार्जिंग अभावी संपर्काची साधने बंद पडल्याने नागरिकांना दैनंदिन जीवनात विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

जामगाव परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करून तुटलेले वीज खांब व वाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी हेस्कॉम प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




