belgaum

पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू देऊ नका : मंत्री सतीश जारकीहोळी

0
Satish jarkiholi
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात पावसाच्या तुटीमुळे निर्माण होणारी संभाव्य पाण्याची टंचाई लक्षात घेता, नागरिकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राखीव निधीचा तातडीने वापर करावा. आवश्यकतेनुसार खाजगी बोअरवेल आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलावीत, असे कडक निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना ते बोलत होते.

पावसाळा सुरू झाला असल्यामुळे ज्या शाळांच्या खोल्या गळत आहेत किंवा कमकुवत झाल्या आहेत, अशा वर्गखोल्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत वर्ग भरवले जाऊ नयेत, अशी सक्त ताकीद त्यांनी शिक्षण विभागाला दिली. तसेच जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची टंचाई भासू नये म्हणून पुरेसा साठा करून ठेवावा आणि जीवितहानी झाल्यास तातडीने भरपाई द्यावी, असे आदेशही त्यांनी दिले.

पावसाळ्यात साथीचे रोग बळावण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने पूर्वतयारी करावी, तसेच खरिपात बियाणे आणि खतांचा तुटवडा भासणार नाही याची कृषी विभागाने काळजी घ्यावी, असे सांगत अधिकाऱ्यांनी आपत्तीच्या वेळी तातडीने प्रतिसाद देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याच बैठकीत आमदार राजू सेठ यांनी महानगरपालिका आणि पाणी पुरवठा कंपनीने योग्य समन्वय ठेवून महापालिका हद्दीत सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आवाहन केले.

 belgaum

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माहिती दिली की, यंदा खरिपात सरासरीपेक्षा २६ टक्के पावसाची तूट आहे. सध्या जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील ३२ गावांना पाणीटंचाईची झळ बसत असून, तेथे टँकर आणि खाजगी बोअरवेलद्वारे पाणी पुरवले जात आहे.

गरज भासल्यास शहरासाठी ३५ टँकर्स सज्ज असून त्यावर जीपीएसद्वारे देखरेख ठेवली जाईल. तसेच कृषी विभागाकडून सांगण्यात आले की, जिल्ह्यात ८० टक्के पेरणी पूर्ण झाली असून खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मूग आणि उडीद पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै तर इतर पिकांसाठी ३० जुलै आहे. या बैठकीला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट टळले!
समाधानकारक मान्सूनमुळे कृत्रिम पावसाची गरज नाही : मंत्री जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह : यंदा बेळगाव जिल्ह्यात झालेल्या उत्तम पावसामुळे पाण्याचा प्रश्न संपला असून, सध्यातरी येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा कोणताही विचार नसल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. मुख्य जलाशयांसह नद्यांमधील पाणीपातळी सुधारली असून सुरुवातीची पावसाची तूट लवकरच भरून निघेल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

शहरातील फूटपाथवरील अतिक्रमणे हटवताना प्रशासनाने गरीब विक्रेत्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना पुरेशा वेळाची सवलत द्यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या बाधित फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आगामी काळात नियमांनुसार पर्यायी जागा देण्याबाबत सरकार सकारात्मक पावले उचलेल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

पावसामुळे दुरवस्था झालेल्या कित्तूर आणि बैलहोंगल परिसरातील रस्त्यांची सध्या तातडीने मलमपट्टी करून ते वाहतुकीसाठी सुरळीत केले जातील. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून या सर्व मार्गांच्या नवीन रस्ते बांधणीला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या असून, पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून विशेष पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले. यमकनमर्डी येथील प्रकरणावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना, निवडणुका जवळ आल्याने किरकोळ मुद्द्यांचे राजकारण केले जात असल्याचे सांगत कायदा-सुव्यवस्था राखण्यालाच आपले प्राधान्य असेल, असे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.