बेळगाव लाईव्ह: जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे मान्सून दाखल न झाल्याने बेळगाव जिल्ह्यात दुष्काळाची भीती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली असून, आणखी चार ते पाच दिवस पाऊस कायम राहिल्यास कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
शनिवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यासह पश्चिम घाट परिसरातही सलग पाऊस सुरू असल्याने कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा, हिरण्यकेशी आणि मार्कंडेय नद्यांच्या पाणीप्रवाहात लक्षणीय वाढ झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
मंत्री जारकीहोळी म्हणाले की, जून महिन्यात जिल्ह्यात सुमारे २९ टक्के पावसाची तूट होती. त्यामुळे दुष्काळाची शक्यता निर्माण झाली होती. काही तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाचे प्रमाण कमी असले तरी सध्याच्या परिस्थितीत घाबरण्याचे कारण नाही. अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्यास क्लाऊड सीडिंग (कृत्रिम पाऊस) करण्याबाबत सरकार निर्णय घेईल.
राकसकोप्प धरणातही पाणीसाठा वाढू लागला असून, आणखी एक आठवडा पाऊस सुरू राहिल्यास धरणात समाधानकारक पाणीसाठा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पावसाअभावी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास त्याचे स्वतंत्र सर्वेक्षण करून आवश्यक ती मदत करण्याबाबत शासन विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी रस्ते खोदकामाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. गेल्या काही वर्षांपासून विविध कामांसाठी रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदारांना कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कामात दिरंगाई झाल्यास पावसाळ्यात ती कामे स्थगित केली जातील, असा इशारा त्यांनी दिला.
फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असून, संबंधितांना पूर्वसूचना आणि नोटीस देऊनच कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जातील, असेही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.




