बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राच्या पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील नद्यांवर दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत अवघ्या २४ तासांत सुमारे ५ फुटांनी वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी पूर्णपणे कोरडी पडलेली कृष्णा नदी आता पुन्हा दुथडी भरून वाहू लागली असून, नदीतील पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा एकदा पुराची भीती निर्माण झाली आहे.
मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने नागरिक चिंतेत होते. मात्र, आता नद्यांमध्ये पाणी आल्याने दिलासा मिळाला असला, तरी वाढत्या पाणीपातळीमुळे नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

हवामानाचा हा कल कायम राहिल्यास आणि महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील सखल भाग तसेच नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.




