बेळगाव लाईव्ह : सीमाभागात सुरू असलेल्या विशेष मतदार फेरनिरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या, रविवारी (५ जुलै) सायंकाळी ५ वाजता खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे.
समितीच्या वतीने नुकतीच बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी तसेच महानगरपालिका आयुक्त आणि उपायुक्त यांची भेट घेऊन SIR प्रक्रियेसंदर्भातील विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. सध्या अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध असल्याने ही प्रक्रिया मराठी भाषेतही राबविण्यात यावी, अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे.
याशिवाय, राष्ट्रीय पक्षांप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीलाही संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगावी आणि समितीच्या प्रभागनिहाय प्रतिनिधींना (BLA/पोलिंग एजंट) या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली. त्यावर महानगरपालिका आयुक्तांनी समितीने मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधींची यादी प्रशासनाकडे सादर केल्यास त्यांना प्रक्रियेत सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही दिल्याचे समितीने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीत बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातील समितीचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य तसेच मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीला उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी (पोलिंग एजंट) म्हणून काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची यादी सोबत आणावी, असेही आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, एम. जी. पाटील आणि अमर येळ्ळूरकर यांनी केले आहे.




