बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहर गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पथकाने अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळवत खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून १ किलो ७०४ ग्रॅम गांजा आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, जप्त मालाची एकूण किंमत ₹९१ हजार आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी आकाश दिलीप दोडमनी (रा. जयनगर, हुंच्यानट्टी, बेळगाव) हा कार्तिक (रा. कंग्राळी बी.के., बेळगाव) याच्याकडून गांजा आणून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जांबोटी रस्त्यामार्गे विक्रीसाठी जात असल्याची माहिती सीसीबीला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजन्त्री व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ₹८० हजार किमतीचा १ किलो ७०४ ग्रॅम गांजा तसेच ₹११ हजार किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८४/२०२६ दाखल करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्याच्या कलम 20(b)(i)(B) आणि 8(c) अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.
खून प्रकरणातील फरार आरोपी असल्याचे उघड
तपासादरम्यान अटक करण्यात आलेला आकाश दोडमनी हा बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १३७/२०२६ मधील खून आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे समोर आले. त्यामुळे या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या गुन्ह्यासह खून प्रकरणातील फरार आरोपीलाही अटक करण्यात सीसीबीला यश आले आहे.
या उल्लेखनीय कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त (डीसीपी) यांनी सीसीबीचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.





