बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच पीयूसी (इयत्ता १२ वीपर्यंतच्या) महाविद्यालयांना मंगळवार, ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दोन्ही तालुक्यांतील अनेक भागांमध्ये जनजीवनावर परिणाम झाला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुट्टी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, विशेषतः खानापूर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. अनेक ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. बेळगाव तालुक्यातही दिवसभर रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून वातावरण ढगाळ आहे.

हवामान विभागाने आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पालकांनीही मुलांना अनावश्यकपणे घराबाहेर न पाठवण्याचे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




