बेळगाव लाईव्ह :निपाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील स्थवनिधी घाट परिसरात मंगळवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने समोरून जात असलेल्या कारला जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली.
अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील सोयल मुनेर (वय ३६) आणि इचलकरंजी येथील विनय पाटील अशी झाली आहे. जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घाट परिसरातून उतरत असताना ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रकने समोरून प्रवास करत असलेल्या कारला प्रचंड वेगाने धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की कार पूर्णपणे चेंगरली गेली. कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच निपाणी पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य राबवून जखमींना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलीसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत वाहने पर्यायी मार्गाने सोडली. नंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
या प्रकरणी निपाणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.




