बेळगाव लाईव्ह: जादा व्याजदराचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक उभी करून फसवणूक केल्याप्रकरणी ‘श्रीदेवी कूगे व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. तपासात 254 गुंतवणूकदारांकडून तब्बल 25 कोटी 79 लाख रुपयांची उभारणी करून त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
धारवाड येथील प्रवीण चंद्रशेखर दोड्डमनी यांनी 16 जून 2026 रोजी दिलेल्या तक्रारीवरून माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार, कंपनीचे संचालक सुभोध होन्नप्पा कूगे आणि प्रमोद फकीरप्पा हळेमणी यांनी आरबीआय, सेबी किंवा इतर कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता नागरिकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या. मात्र, मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली.
तपासादरम्यान या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रमोद फकीरप्पा हळेमणी याला यापूर्वीच अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. त्यानंतर मुख्य आरोपी सुभोध होन्नप्पा कूगे (रा. महांतेशनगर, बेळगाव) याचा शोध सुरू होता. अखेर 13 जुलै रोजी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पुढील तपासासाठी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या तपासात 2025 पासून 254 नागरिकांकडून 25.79 कोटी रुपये गुंतवणुकीच्या नावाखाली जमा करून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ‘श्रीदेवी कूगे व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत पैसे गुंतवून फसवणूक झालेल्या नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह माळमारुती पोलीस ठाण्यात हजर राहून माहिती द्यावी, असे आवाहन बेळगाव पोलिसांनी केले आहे.





