बेळगाव लाईव्ह : आनंद क्रिकेट कोचिंग अकादमी, बेळगावच्या दोन युवा महिला क्रिकेटपटू अन्वी येल्लूरकर आणि वैष्णवी कांबळे यांची कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (KSCA) धारवाड विभागाच्या अंडर-१९ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे अकादमीसह बेळगावच्या क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण आहे.
या दोन्ही खेळाडूंनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ही निवड मिळवली आहे. त्यांच्या यशामागे आनंद क्रिकेट कोचिंग अकादमीचे प्रशिक्षक नागेश सुतार आणि नंदकुमार मलतवाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्ती आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे फिटनेस प्रशिक्षक प्रसाद सुगूर आणि हरीश पाटरोट यांच्या योगदानाबद्दलही अकादमीने विशेष आभार व्यक्त केले आहेत.

KSCA धारवाड विभागाच्या अंडर-१९ महिला क्रिकेट स्पर्धेला २३ जुलै २०२६ पासून बेंगळुरू येथे प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत अन्वी आणि वैष्णवी उत्कृष्ट कामगिरी करत बेळगाव आणि कर्नाटकचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास आनंद क्रिकेट कोचिंग अकादमीने व्यक्त केला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल अकादमीतर्फे दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले असून आगामी स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.





