बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील लक्ष्मी नगर परिसरातील नागरिकांना सध्या पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील मुख्य जलवाहिनीमध्ये गटारीचे पाणी मिसळत असल्याच्या निषेधार्थ संतप्त महिला आणि नागरिकांनी आज महानगरपालिका कार्यालयावर धडक दिली. या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, या मागणीसाठी पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
लक्ष्मी नगरमधील मरगाई गल्ली परिसरात सध्या परिस्थिती बिकट झाली आहे. मलप्रभा टप्पा १ अंतर्गत येणाऱ्या या झोपडपट्टी पुनर्वसन भागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शेकडो कुटुंबे वास्तव्यास आहेत.
या भागातील मुख्य रस्ता तयार करून तब्बल २५ वर्षे उलटून गेली आहेत. गेल्या अनेक दशकांपासून येथील रस्ते आणि सांडपाण्याच्या वाहिन्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
गटारींचे चेंबर्स वारंवार तुडुंब भरून वाहत असून, हे दूषित पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला अत्यंत दूषित आणि आरोग्यास घातक पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे.

पावसाळा सुरू झाला की गटारींचे पाणी रस्त्यावरून वाहून लोकांच्या घरात शिरते. यामुळे संपूर्ण परिसरात संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. या गंभीर समस्येबाबत आतापर्यंत दोन ते तीन वेळा स्थानिक आमदार, महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित अभियंत्यांना निवेदने देण्यात आली आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
या प्रशासकीय दुर्लक्षामुळे हताश झालेल्या नागरिकांनी आज अखेर महानगरपालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्याला स्वच्छ पिण्याचे पाणी आणि रस्त्यांची सोय करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.




