belgaum

दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दक्षिण-पश्चिम मान्सून लांबल्याने बेळगाव शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाणीपातळी खालावली आहे. भविष्यातील संभाव्य पाणीसंकट टाळण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातून २ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

हिडकल जलाशयात सध्या केवळ १ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, हा साठा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंतच पुरेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगामी काळात पुरेसा पाऊस न झाल्यास शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. ऑगस्ट महिन्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा राखण्यासाठी महाराष्ट्राकडून २ टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात २० जून रोजी एक महत्त्वाची बैठक होणार आहे.

दोन्ही राज्यांच्या परस्पर हिताच्या मुद्द्यांसह बेळगावच्या पाणीटंचाईचा प्रश्न या बैठकीच्या अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. जिल्हा प्रशासनाने तयार केलेला २ टीएमसी पाण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यामार्फत या बैठकीत अधिकृतपणे मांडला जाईल.

 belgaum

बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या प्राथमिक बैठकीतही यावर चर्चा झाली होती. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासन सर्व पातळ्यांवर प्रयत्न करत असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

पाऊस लांबल्याने उद्भवलेल्या या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्राकडून पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, उद्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.