बेळगाव लाईव्ह:सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज रै हे खरोखर उत्तम अभिनेते असले तरी त्यांनी आपला अभिनय चित्रपटापुरता मर्यादित ठेवावा. हिंदुत्व अथवा धार्मिक गोष्टींमध्ये नाक खुपसू नये. सध्या धर्मस्थळ प्रकरणात त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली असून ते निषेधार्ह आहे. तेंव्हा त्यांच्यावर चित्रपटसृष्टीसह सार्वजनिक बहिष्कार टाकला जावा. एवढेच नव्हे तर त्यांना अटक करून त्यांचीही चौकशी केली जावी, अशी मागणी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.
बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. प्रमोद मुतालिक यांनी सांगितले की, फक्त अत्यंत पवित्र तीर्थस्थळच म्हणून नव्हे तर शिक्षण, वैद्यकीय उपचार, अनाथ आश्रम वृद्धाश्रम यासारख्या सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या धर्मस्थळ या गावाला गेल्या दोन-तीन वर्षापासून लक्ष्य करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यासाठी ‘मास्क मॅन’च्या स्वरूपात एक पात्र तयार करून षडयंत्र रचण्यात आले आणि त्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. धर्मस्थळ आणि परिसरातील हजारो मुलींवर अत्याचार बलात्कार करण्याबरोबरच त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे मृतदेह तेथेच पुरण्यात आल्याचा आरोप केला गेला आहे.
जवळपास दीड वर्ष गाजलेल्या या प्रकरणानंतर काल तथाकथित चिनय्या नामक मास्क मॅनने एसआयटीकडे एक अर्ज दिला असून जो न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्या मास्क मॅनने या प्रकरणात फक्त मला एकट्याला दोषीने न ठरवता यामध्ये फार मोठ्या मातब्बर व्यक्ती सहभागी असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जावी, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्या मातब्बर व्यक्तींमध्ये प्रकाश राज रै या अष्टपैलू अभिनेत्याचाही समावेश आहे.
प्रकाश राज रै खरोखर उत्तम अभिनेते असले तरी त्यांनी आपला अभिनय चित्रपटापुरता मर्यादित ठेवावा. हिंदुत्व अथवा धार्मिक गोष्टींमध्ये नाक खुपसू नये. सध्या धर्मस्थळ प्रकरणात त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली असून ते निषेधार्ह आहे. तेंव्हा त्यांच्यावर चित्रपटसृष्टीसह सार्वजनिक बहिष्कार टाकला जावा एवढेच नव्हे तर त्यांना अटक करून त्यांचीही चौकशी केली जावी अशी माझी मागणी आहे असे सांगून या संदर्भात बेंगलोर येथील चित्ररंग मंडळाला आम्ही निवेदन देणारा आहोत, अशी माहिती मुतालिक यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी हरिहर (जि. दावणगिरी) येथील एका सार्वजनिक सभेमध्ये म्हैसूरच्या प्रा. भगवान या हिंदूविरोधी अत्यंत नीच माणसाने हिंदूंचे आराध्य दैवत श्री रामां विरुद्ध अत्यंत अश्लील वक्तव्य केले आहे. ही कृती राज्यघटना आणि कायदा पायदळी तुडवणारी आहे. ज्यांच्या मनामनामध्ये राम वसला आहे अशा कोट्यावधी लोकांसाठी पूजनीय असलेल्या श्रीरामांच्या बाबतीत अशा पद्धतीने अश्लील वक्तव्य केलेले खपवून घेतले जाणार नाही. तेव्हा सरकारने व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून प्रा. भगवान याला तुरुंगात डांबून कठोर शिक्षा करावी. जर असे झाले नाही तर आमच्या श्रीरामांना बदनाम करणाऱ्याला घरात घुसून आम्ही शिक्षा करू.
हे जर अल्लाच्या बाबतीत घडले असते तर त्या भगवानला जिवंत जाळले गेले असते. आम्हालाही तसे करण्यास वेळ लागणार नाही, तथापि आम्ही शांततेने कायद्याच्या चौकटीत कारवाईची मागणी करत आहोत याचा सरकार प्रशासनाने विचार करावा, असे प्रमोद मुतालिके यांनी शेवटी स्पष्ट केले. याप्रसंगी श्रीराम सेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम सेनेच्या उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनेते प्रकाश राज रै यांच्या छायाचित्रांची होळी करून निषेध व्यक्त केला.




