बेळगाव लाईव्ह :
विशेष सघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेदरम्यान बेळगाव जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 99 हजार 870 मतदारांची माहिती अद्याप नोंदवली गेलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मतदारांची अंतिम मतदार यादीत नावे राहतील का, याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात एकूण 41 लाख 22 हजार 869 मतदार असून त्यापैकी 38 लाख 22 हजार 999 मतदारांची माहिती यशस्वीरित्या मॅप करण्यात आली आहे. मात्र जवळपास 3 लाख मतदारांची माहिती अपूर्ण अथवा उपलब्ध नसल्याने त्यांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे.
शहरी मतदारसंघांमध्ये ही समस्या अधिक गंभीर असल्याचे दिसून आले आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 71,293 मतदारांची माहिती अपूर्ण असून बेळगाव दक्षिणमध्ये 42,964 मतदार अद्याप मॅप झालेले नाहीत. एकूण 1.1 लाखांहून अधिक अपूर्ण नोंदी या शहरी मतदारसंघांतील आहेत.
कर्नाटकातील सर्वाधिक 18 विधानसभा मतदारसंघ असलेल्या बेळगाव जिल्ह्यात 20,68,398 महिला, 20,54,276 पुरुष आणि 195 तृतीयपंथीय मतदार असून जिल्ह्यात 4,525 मतदान केंद्रे आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मॅपिंग 2001 च्या मतदार यादीच्या आधारे केले जात आहे. मात्र अनेक जुन्या नोंदी उपलब्ध नसल्याने पडताळणी प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत.
यासाठी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घराघरात जाऊन पडताळणी करणार आहेत. मतदारांनी निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या 12 कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र आणि स्वयंप्रमाणित घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.

आवश्यक माहिती किंवा कागदपत्रे न दिल्यास संबंधित मतदारांना अनुपस्थित म्हणून नोंदवले जाऊ शकते. त्यानंतर मतदार यादीतून नाव वगळले गेल्यास पुन्हा नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया अधिक वेळखाऊ ठरू शकते.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 3 ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि दावे स्वीकारले जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केली जाणार आहे.
प्राथमिक सर्वेक्षणात असेही आढळून आले आहे की, अपूर्ण नोंदी असलेल्या अनेक मतदारांपैकी काहीजण परदेशात किंवा दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबादसारख्या शहरांत वास्तव्यास आहेत. तरीही त्यांची नावे बेळगावच्या मतदार यादीत कायम आहेत. याशिवाय इतर राज्ये व देशांतील 50 हजारांहून अधिक नागरिक सध्या बेळगाव जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची नोंदही अधिकाऱ्यांनी केली आहे.




