बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात गोडगेरी गावातील माजी सैनिकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. दोन कोटी रुपयांच्या विम्याच्या रकमेसाठी पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा गंभीर आरोप आता समोर आला आहे.
या धक्कादायक घटनेच्या तीन महिन्यांनंतर अधिकार्यांनी पुरलेला मृतदेह जमिनीतून बाहेर काढून त्याची पुन्हा तपासणी केली आहे. बेळगावचे एसी श्रवणकुमार यांच्या उपस्थितीत मृतदेहाचे अवशेष गोळा करण्यात आले असून ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (FSL) पाठवण्यात आले आहेत. रस्ते अपघातात जखमी झालेल्या माजी सैनिकाला रुग्णालयातच विष देऊन ठार मारण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
संदीप मांजरी असे मृत माजी सैनिकाचे नाव असून त्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावून निवृत्ती घेतली होती. काही महिन्यांपूर्वी हुक्केरी येथील जत्रा संपवून घरी परतत असताना संदीप यांचा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच संदीप यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात जन्य मृत्यू असल्याचे मानले जात होते. परंतु, काही दिवसांनी संदीप यांच्या कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी या मृत्यूमागे मोठा कट असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे यमकनमर्डी पोलिसांनी तपास सुरू केला असून आता या प्रकरणाचे विविध पैलू समोर येत आहेत.
मृत संदीप यांची पत्नी सुमा आणि तिचा प्रियकर पुंडलिक यांनी मिळून हा कट रचल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यांचे अनैतिक संबंध उघड होऊ नयेत आणि पतीच्या मृत्यूनंतर विम्याची मोठी रक्कम मिळावी, या उद्देशानेच हा पूर्वनियोजित खून करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, रस्ते अपघाताचा गैरफायदा घेत आरोपींनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संदीप यांना जेवणातून किंवा औषधातून विष दिले आणि त्यांची हत्या केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आता महसूल आणि पोलीस प्रशासनाने पुनर्तपासाचे पाऊल उचलले आहे.

घटनेच्या तीन महिन्यांनंतर मृतदेह बाहेर काढून बेळगावचे एसी श्रवणकुमार यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेहावर खरोखरच विषप्रयोग झाला होता का, हे शोधण्यासाठी आता वैज्ञानिक पद्धतीने प्रयोगशाळेत चाचणी केली जात आहे. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच हा नेमका खून आहे की नैसर्गिक मृत्यू, हे स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या प्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे गोडगेरी गावात सध्या तणावाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत माजी सैनिकाच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसांच्या अंतिम तपास अहवालानंतरच या प्रकरणाचे सत्य समोर येणार आहे.




