बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांना कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी माळमारुती पोलीस स्थानकाच्या तक्रारीच्या आधारे कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीशीविरोधात आज, शुक्रवार दि. १९ जून रोजी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले.
शुभम शेळके यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये पाच लाख रुपयांचा बॉण्ड तसेच तितक्याच रकमेचे दोन जामीनदार सादर करून पोलीस उपायुक्तांच्या न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या प्रकरणात शेळके यांच्या वतीने गुरुवार दि. १८ जून रोजी अॅड. महेश बिर्जे उपस्थित राहिले होते. दरम्यान, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या प्रचारात शुभम शेळके सक्रिय असल्यानेच पोलिस प्रशासनाने ही नोटीस बजावल्याची चर्चा सीमाभागात सुरू आहे.
यापूर्वीही शुभम शेळके यांना ‘तडीपार का करण्यात येऊ नये?’ अशी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळीही संबंधित नोटीशीला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

आता नव्याने बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीशीविरोधात अॅड. महेश बिर्जे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यावेळी अॅड. महेश बिर्जे, शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, अॅड. बाळासाहेब कागलकर आणि अॅड. वैभव कुट्रे उपस्थित होते.




