बेळगाव लाईव्ह : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेण्यासाठी कोल्हापूरकडे निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या कर्नाटक पोलिसांनी हत्तरगी टोल नाक्यावर अडवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कारवाईच्या निषेधार्थ समितीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी टोलनाक्याजवळ महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
शनिवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ विविध वाहनांमधून कोल्हापूरकडे रवाना झाले होते. मात्र हत्तरगी येथील टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी त्यांचा ताफा रोखला. पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत कार्यकर्त्यांनी महामार्गावरच बसून जोरदार घोषणाबाजी केली.
उपलब्ध माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, याबाबतचा लेखी आदेश दाखवण्याची मागणी समितीचे नेते तथा वकील अमर येळ्ळूरकर यांनी केली असता पोलिसांनी तो देण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीमाप्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी समितीचे शिष्टमंडळ कोल्हापूरला जाणार होते. यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे भेटीची वेळ मागण्यात आली होती.
तसेच दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांनीही भेटीसाठी वेळ मिळविण्याचे प्रयत्न केल्याची माहिती समितीच्या नेत्यांनी दिली.
मात्र, कोल्हापूरकडे जात असतानाच बेळगाव पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून, दोन्ही राज्यांच्या प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे.




