बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहर पोलिसांनी 20 जून रोजी विविध ठिकाणी धाडसत्र राबवत शस्त्र बाळगणे, अमली पदार्थांची विक्री, गांजा सेवन तसेच अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. या कारवायांमध्ये अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तलवार बाळगणारा तरुण ताब्यात मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत समर्थ नगर परिसरात एका 23 वर्षीय तरुणाकडे बेकायदेशीररीत्या धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा व कर्नाटक पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तलवार जप्त केली.
अवैध दारू विक्रीवर कारवाई मारिहाळ पोलीसांनी हुदली परिसरात धाड टाकून परवान्याशिवाय दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस अटक केली. त्याच्याकडून विविध ब्रँडच्या मद्याच्या टेट्रा पॅकची जप्ती करण्यात आली.
बसस्थानकात मद्य वाहतूक करणारी महिला पकडली मार्केट पोलिसांनी केंद्रीय बसस्थानक परिसरात एका महिलेकडून गोवा राज्यातील मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणात आणखी एका संशयिताचा सहभाग समोर आला असून दोघांविरुद्ध आबकारी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेरॉईनसह तरुण अटकेत एपीएमसी पोलिसांनी सिद्धेश्वर नगर परिसरात कारवाई करून एका 23 वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्याकडून सुमारे 2.55 ग्रॅम हेरॉईन तसेच दुचाकी जप्त करण्यात आली.
गांजा विक्रीच्या दोन स्वतंत्र कारवाया एपीएमसी पोलिसांनी शाहूनगर परिसरात एका तरुणाकडून 472 ग्रॅम गांजा व दुचाकी जप्त केली. दुसऱ्या प्रकरणात माळमारुती पोलिसांनी शिवबसव नगर परिसरात धाड टाकली असता संशयित आरोपी पळून गेला; मात्र त्याने टाकून दिलेल्या बॅगेतून 585 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपीचा शोध सुरू आहे.
गांजा सेवन करणाऱ्यावरही गुन्हा मार्केट पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका युवकाची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने अमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी केलेल्या या सलग कारवायांबद्दल संबंधित पीएसआय, एएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कौतुक केले आहे.




