belgaum

हेल्मेटवरील QR कोडमुळे अपघातग्रस्तांना तातडीची मदत

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : देशातील आघाडीची हेल्मेट उत्पादक आणि बेळगावस्थित कंपनी वेगा ऑटो अॅक्सेसरीजने आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकत पुण्यातील टेकसोशिओ प्रोजेक्ट्स या कंपनीच्या टागेझे वैद्यकीय ओळख प्रणालीमध्ये धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. या निर्णयामुळे वेगा कंपनीचा प्रवास केवळ अपघातांपासून संरक्षण देणाऱ्या हेल्मेट निर्मितीपुरता मर्यादित न राहता अपघातानंतर तातडीची मदत मिळवून देण्याच्या दिशेनेही विस्तारला आहे.


टागेझेने विकसित केलेल्या या अभिनव प्रणालीमध्ये हेल्मेटवर विशेष प्रकारचा हवामानरोधक क्यूआर कोड बसविण्यात येतो. रस्ते अपघात झाल्यास आपत्कालीन सेवा कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी किंवा घटनास्थळी उपस्थित असलेली कोणतीही व्यक्ती हा क्यूआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन करून जखमी व्यक्तीची महत्त्वाची वैद्यकीय माहिती तत्काळ पाहू शकते.


या डिजिटल प्रोफाइलमध्ये आपत्कालीन संपर्क क्रमांक, रक्तगट, अॅलर्जी, पूर्वीचे आजार, सुरू असलेली औषधे आणि विमा माहिती यांसारखे महत्त्वाचे तपशील उपलब्ध असतात. अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘सुवर्णक्षणां’मध्ये (गोल्डन अवर) ही माहिती उपलब्ध झाल्यास उपचार अधिक जलद आणि प्रभावी होण्यास मदत होऊ शकते.

 belgaum


या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅपची आवश्यकता नाही. क्यूआर कोड थेट सुरक्षित संकेतस्थळावरील वैयक्तिक प्रोफाइलशी जोडलेला असतो. कोणत्याही स्मार्टफोनच्या ब्राऊझरमधून ही माहिती पाहता येते. तसेच ही सुविधा विविध भाषांमध्ये उपलब्ध असल्याने देशभर आणि परदेशातही ती उपयुक्त ठरणार आहे.
वेगा आणि टागेझे यांच्या म्हणण्यानुसार, या गुंतवणुकीमुळे तंत्रज्ञानाची पायाभूत सुविधा अधिक मजबूत होईल आणि भारतासह वेगा हेल्मेट विकल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये या सुविधेचा विस्तार करण्यास गती मिळेल.


हेल्मेट आणि रस्ते सुरक्षा क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना ही भागीदारी महत्त्वाची मानली जात आहे. भविष्यात वेगा आणि अॅक्सोर या हेल्मेट मालिकांमध्ये स्मार्ट ट्रॅकिंग आणि अत्याधुनिक आपत्कालीन प्रतिसाद तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी संशोधन आणि विकासावर भर दिला जाणार असल्याचेही दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.


वेगा कंपनीने सांगितले की, रायडर्सची सुरक्षितता ही नेहमीच कंपनीच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिली असून टागेझेसोबतची भागीदारी अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि प्रतिसादक्षम सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
टागेझे वैद्यकीय ओळख प्रणालीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक गायकवाड यांनी सांगितले की, या भागीदारीमुळे जीव वाचविणाऱ्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लोकांपर्यंत प्रसार होईल आणि रस्त्यांवरील आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी दुचाकीस्वार अधिक सज्ज होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.