belgaum

पालक, शिक्षक आणि समाजाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : स्पर्धेच्या युगात शिक्षण क्षेत्रातील वाढत्या आव्हानांमुळे ग्रामीण भागातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती चिंताजनक बनत चालल्याचे मत समाजचिंतक गोपाळराव बिर्जे यांनी व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक, शिक्षक, समाजनेते आणि स्वतः विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

आजच्या काळात ९० ते ९५ टक्के गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना अपेक्षित संधी मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील अनेक विद्यार्थी शैक्षणिक स्पर्धेत मागे पडत असल्याचे वास्तव दिसून येते. ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे शेतीवर अवलंबून असल्याने पालकांना मुलांच्या शिक्षणाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. आर्थिक अडचणी, अशिक्षितपणा आणि सामाजिक परंपरांचे ओझे यामुळेही विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर परिणाम होत असल्याचे बिर्जे यांनी नमूद केले.

त्यांच्या मते, प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होत नसल्याने पुढील शिक्षणात अडचणी निर्माण होतात. सातवीपर्यंत विद्यार्थ्यांना सहज पुढील वर्गात प्रवेश मिळत असला तरी वाचन, लेखन आणि गणितातील मूलभूत कौशल्ये अनेकांमध्ये विकसित होत नाहीत. याचा परिणाम दहावी आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या टप्प्यावर प्रकर्षाने जाणवतो.

 belgaum

किशोरवयात मोबाईल, दूरदर्शन आणि इतर आकर्षणांमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडील लक्ष विचलित होत असल्याचेही त्यांनी सांगितले. काही राजकीय नेते निवडणुकांच्या काळात तरुणांना चुकीच्या मार्गाकडे वळवतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

समाजाच्या प्रगतीसाठी पालकांनी मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, त्यांच्या अभ्यासाची नियमित चौकशी करावी आणि घरातील वातावरण सकारात्मक ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आपली भूमिका ओळखून त्यांच्यात अभ्यासाची सवय, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करावा, असे मत व्यक्त करण्यात आले.

पुढाऱ्यांनी विद्यार्थ्यांना राजकारणापासून दूर ठेवून शैक्षणिक स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनीही मोबाईल आणि मनोरंजनावर अनावश्यक वेळ खर्च न करता नियमित अभ्यास, व्यायाम, चांगली संगत, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास या गुणांचा अंगीकार करावा. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा यांच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते, असा विश्वास गोपाळराव बिर्जे यांनी व्यक्त केला आहे.

– गोपाळराव बिर्जे, बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.