belgaum

क्रॉस-व्होटिंगच्या संशयाने खानापूरच्या राजकारणात खळबळ

0
Khanapur news
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधान परिषद निवडणुकीतील कथित क्रॉस-व्होटिंग प्रकरणामुळे भाजप-जेडीएस आघाडीत निर्माण झालेल्या राजकीय खळबळीचे पडसाद आता स्थानिक राजकारणातही उमटू लागले आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन केल्यानंतर विविध मतदारसंघांतील राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू झाली आहे. अशातच खानापूरच्या माजी आमदारांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

विधान परिषदेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप-जेडीएस आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षातील काही आमदारांनी अधिकृत भूमिकेच्या विरोधात मतदान केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर भाजपने स्वतंत्र चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षाच्या मतांमध्ये झालेल्या गळतीमागे नेमके कोण जबाबदार होते, याचा शोध घेण्याचे काम सुरू असताना काही आमदारांची नावे राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. त्यामध्ये खानापूरच्या विद्यमान भाजप आमदारांचाही समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

याच पार्श्वभूमीवर खानापूरच्या माजी आमदारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत अनेक राजकीय प्रश्न उपस्थित केले आहेत. विधान परिषद निवडणुकीतील निकालांचा उल्लेख करत त्यांनी विरोधी पक्षातील कथित क्रॉस-व्होटिंगमुळे अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे म्हटले आहे. तसेच, खानापूरच्या भाजप आमदारांचे नाव या चर्चेत वाचल्यानंतर 2023 च्या विधानसभा निवडणुकीतील काही घटनांकडे पुन्हा पाहण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

 belgaum

आपल्या पोस्टमध्ये माजी आमदारांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान संबंधित आमदार काँग्रेसच्या तत्कालीन महिला मंत्र्यांच्या संपर्कात होते का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, त्या काळात घडलेल्या काही राजकीय हालचालींमुळे काँग्रेस उमेदवाराच्या पराभवावर परिणाम झाला होता का, याबाबतही त्यांनी अप्रत्यक्षपणे शंका व्यक्त केली आहे.

“स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मला बळीचा बकरा बनवण्यात आले का?” असा सवालही त्यांनी पोस्टमधून उपस्थित केला आहे. पक्षनिष्ठा, विचारसरणी आणि वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा यांच्यातील संघर्षावरही त्यांनी भाष्य केले आहे.

माजी आमदारांच्या या वक्तव्यानंतर खानापूरच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही राजकीय निरीक्षकांच्या मते, क्रॉस-व्होटिंगच्या चर्चेमुळे केवळ विधान परिषद निवडणुकीपुरताच प्रश्न मर्यादित राहिलेला नसून, त्यातून मागील विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी भाजपच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा करणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

Khanapur logo

दरम्यान, भाजपच्या चौकशी समितीकडून आमदारांच्या मतदानाच्या पद्धतीचा अभ्यास केला जात असून, कथित क्रॉस-व्होटिंगसाठी जबाबदार असलेल्या सदस्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत खानापूरच्या संदर्भात सुरू झालेली राजकीय चर्चा आणि माजी आमदारांनी उपस्थित केलेले प्रश्न याकडे आता जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान  खानापूरच्या त्या विद्यमान लोकप्रतिनिधीने या संदर्भात माध्यमांना स्पष्टीकरण देखील दिले आहे कथित “क्रॉस व्होटिंग”च्या आरोपांना त्यांनी ठाम शब्दांत फेटाळून लावले आहे. आपल्या पक्षाच्या अधिकृत व्हीपनुसारच आपण मतदान केल्याचा दावा त्यांनी केला आहे. काही वृत्तवाहिन्या, माध्यमे आणि राजकीय विरोधकांकडून जाणूनबुजून बदनामीचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी करत हे मतदान पक्षाने दिलेल्या निर्देशांनुसारच झाले असून, काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याचे आरोप पूर्णपणे खोटे, निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत असेही म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.