बेळगाव लाईव्ह विशेष: बेळगाव सीमा प्रश्नासाठी आंदोलने, अटक-सत्रे आणि पोलिसांचा बंदोबस्त हे सीमाभागातील मराठी जनतेसाठी नवे नाही. मात्र शनिवारी घडलेली घटना एका नेत्याच्या जिद्दीची आणि संघर्षशील वृत्तीची नवी कहाणी सांगून गेली. पोलिसांच्या कडेकोट नजरकैदेत असतानाही माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी हार मानली नाही. योग्य संधीची वाट पाहत त्यांनी पोलिसांना चकवा दिला आणि थेट कोल्हापूर गाठत सीमा प्रश्नाचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सीमा प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ रवाना झाले होते. मात्र कर्नाटक प्रशासनाने प्रमुख नेत्यांना जिल्हाबंदीचे आदेश बजावले होते. ज्येष्ठ नेते प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, लक्ष्मीकांत पाटील आणि मालोजी अष्टेकर यांना कोल्हापूरकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शनिवारी सकाळी हत्तरगी टोलनाक्यावर पोलिसांनी समितीच्या वाहनांना अडवले. इतर नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावरच आंदोलनाला बसले. अनेकांना वाटले की आता हा प्रयत्न इथेच थांबणार. मात्र मालोजी अष्टेकर शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत होते. काही वेळ गाडीतच थांबून त्यांनी पोलिसांच्या हालचाली पाहिल्या आणि योग्य क्षणी गर्दीतून बाहेर पडत दुसऱ्या वाहनाच्या मदतीने कोल्हापूरच्या दिशेने प्रयाण केले.
कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. सर्किट हाऊसपर्यंत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या या धाडसी प्रयत्नाची माहिती मिळताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, अष्टेकर पोलिसांच्या गराड्यातून निसटल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. टोलनाक्यावर अडवलेल्या इतर कार्यकर्त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले.
सीमा प्रश्नाच्या लढ्यात विजय किंवा पराजयापेक्षा संघर्षाची जिद्द अधिक महत्त्वाची मानली जाते. हत्तरगी टोलनाक्यापासून कोल्हापूरच्या सर्किट हाऊसपर्यंतचा मालोजी अष्टेकर यांचा प्रवास ही त्याच जिद्दीची कहाणी ठरली. पोलिसांच्या कोंडीतून मार्ग काढत आपला आवाज सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न आज सीमाभागातील अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणेचा विषय बनला आहे.
आता या घटनेनंतर सीमा प्रश्नाच्या आंदोलनाला नवे बळ मिळणार का, याकडे सीमाभागातील मराठी जनतेचे लक्ष लागले आहे.




