बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मार्केट आणि शहापूर पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकांनी विविध सार्वजनिक ठिकाणी अचानक धाडी टाकून ही प्रतिबंधात्मक कारवाई केली असून तिघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान मार्केट पोलिसांचे पीएसआय पी. जी. गंडवगोळ आणि त्यांच्या पथकाने ओल्ड भाजी मार्केट परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत बसलेल्या मोजीमखान रशीदखान पठाण (वय २६, रा. रुक्मिणी नगर, बेळगाव) याला ताब्यात घेतले.
दुसऱ्या एका कारवाईत, मार्केट ठाण्याचेच पीएसआय मणिकंठ पुजारी यांनी विजया पीयू कॉलेजच्या परिसराजवळ धाड टाकून तोहीब बाशा मकानदार (वय २६, रा. रुक्मिणी नगर, बेळगाव) या तरुणाला अटक केली. पोलिसांच्या पथकाने दोन्ही घटनास्थळांवरून मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिकचे ग्लास जप्त केले असून त्यांच्याविरोधात अबकारी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
तसेच, शहापूर पोलीस ठाण्याच्या पीएसआय एस. एन. बसवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येडियुरप्पा मार्गावरील हॉटेल दत्तप्रसादच्या बाजूला जाहीरपणे मद्यप्राशन करणाऱ्या श्रवण गोविंद नांद्रे (वय ४२, रा. संभाजी नगर, वडगाव, बेळगाव; मूळ रा. नवेली, चंदगड) याला रंगेहात पकडले.
त्याच्याकडून मद्याची बाटली आणि इतर साहित्य जप्त करून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बेळगाव शहरात जाहीरपणे मद्य पिऊन उपद्रव निर्माण करणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई सुरू राहणार असून, या मोहिमेबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.




