belgaum

महामोर्चाला परवानगी नाकारली; निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळाला परवानगी –

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह :
बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चास परवानगी नाकारली आहे. यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांना अधिकृत पत्र पाठवून निर्णय कळविण्यात आला आहे.


समितीने धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय (डीसी ऑफिस) असा मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी ८ जून रोजी परवानगी मागितली होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर ही परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.


पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारण्यामागे काही कारणे दिली आहेत. विशेष शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या मोर्चामुळे शहरातील विविध भाषिक समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 belgaum


तसेच, यापूर्वी समितीच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधात बेकायदेशीर आंदोलने, सार्वजनिक मार्गात अडथळा निर्माण करणे आणि शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याची नोंद असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
मोर्चाचा प्रस्तावित मार्ग शहरातील अतिसंवेदनशील आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या भागातून जात असल्याने नागरिकांना त्रास, वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, असे पोलीस प्रशासनाचे मत आहे.


कर्नाटक पोलीस अधिनियम १९६३ आणि भारतीय राज्यघटनेतील कलम १९(३) अंतर्गत सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी अशा मोर्चांवर वाजवी निर्बंध घालण्याचा अधिकार प्रशासनाला असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली असली तरी समितीला शिष्टमंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.