बेळगाव लाईव्ह : गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकच्या राजकारणात सुरू असलेल्या तीव्र अंतर्गत घडामोडी, दिल्ली ते बंगळुरू धावलेल्या सत्तेच्या मॅरेथॉन चर्चा आणि हायड्रामानंतर अखेर कर्नाटकच्या राजकीय पटावरील सस्पेन्स संपला आहे. काँग्रेस पक्षाला तळागाळांतून पुन्हा उभे करणारे आणि पक्षाचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे ‘कनकपुरा बंडे’ डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकचे नूतेन मुख्यमंत्री म्हणून अधिकृतपणे राज्याची धुरा आपल्या हाती घेतली आहे. या नियुक्तीमुळे कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत सत्तासंघर्षाला तूर्तास पूर्णविराम मिळाला असून, राज्याला एक आक्रमक नेतृत्व लाभले आहे.
बंगळुरू येथील लोकभवनातील भव्य ग्लास हाऊसमध्ये आज संध्याकाळी हा दिमाखदार सोहळा पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी. के. शिवकुमार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. अत्यंत भावूक आणि तितक्याच आत्मविश्वासी वातावरणात, हातात संविधानाची प्रत धरून डी. के. शिवकुमार यांनी आपले आराध्य दैवत ‘वीर गंगाधरा अज्जन्’ यांच्या नावाने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
शपथविधीपूर्वी त्यांनी व्यासपीठावर नतमस्तक होऊन जमिनीला स्पर्श केला आणि अज्जन् यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले, जे उपस्थित जनसमुदायाचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
राजकीय वर्तुळात डी. के. शिवकुमार यांच्या या पदग्रहणाच्या मुहूर्ताची विशेष चर्चा रंगली आहे. ज्योतिष आणि संख्याशास्त्राचा अचूक ताळमेळ घालत, त्यांच्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानला जाणारा ‘मालव्य योग’ निश्चित करण्यात आला होता. तुळ लग्नावर त्यांनी ही शपथ घेतली. राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्याच्या ग्रहदशेत गुरु ग्रह उच्च स्थानी असून ‘दशम भाव’ अत्यंत मजबूत आहे.
कर्नाटकच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, आगामी काळात शिवकुमार यांच्यासमोर येणारी राजकीय आणि प्रशासकीय आव्हाने परतवून लावण्यासाठी आणि एक स्थिर, जनप्रिय सरकार चालवण्यासाठी हा मुहूर्त त्यांना बळ देईल, अशी त्यांच्या समर्थकांमध्ये दाट श्रद्धा आहे.

याच सोहळ्यात डॉ. जी. परमेश्वर यांनी डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या नावाने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नव्या इनिंगची सुरुवात केली. त्यांच्यासोबत के. एच. मुनियप्पा, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोळी, कृष्ण बैरेगौडा, प्रियांक खर्गे, यू. टी. खादर, ईश्वर खंड्रे, यतींद्र सिद्धरामय्या, बैरती सुरेश आणि शरणप्रकाश पाटील या १२ ज्येष्ठ शिलेदारांनी मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा सदस्य राहुल गांधी आणि काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासह देशभरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या हाय-प्रोफाईल सोहळ्याने कर्नाटकच्या राजकारणात काँग्रेसच्या एका नव्या आणि आक्रमक पर्वाचा श्रीगणेशा केला आहे. पक्षसंघटना मजबूत ठेवण्यापासून ते सत्ता हस्तगत करण्यापर्यंतचा रोमहर्षक प्रवास करून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या डी. के. शिवकुमार यांच्या या ‘नव्या इनिंग’कडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.




