बेळगाव लाईव्ह : अलतगे येथील ब्रम्हलिंगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी शाळा कमिटीच्या वतीने जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
या हायस्कूलची इमारत बरीच जुनी झाल्याने तिची अवस्था अत्यंत खराब झाली असून, दरवर्षी पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होते. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीची दुरुस्ती, स्लॅबवरील उर्वरित बांधकाम, नवीन पत्रे बसविणे व इतर आवश्यक कामांसाठी अंदाजे १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हा खर्च भागवण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून घेण्यासाठी शाळा कमिटीचे पदाधिकारी सध्या प्रयत्न करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर शाळा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बेळगावमधील प्रसिद्ध उद्योगपती अनिल पोतदार यांची भेट घेऊन त्यांना शाळेच्या दुरवस्थेची सविस्तर माहिती दिली.

या भेटीदरम्यान अनिल पोतदार यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत तत्काळ चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी आमदार पाटील यांना शाळेच्या इमारतीची वस्तूस्थिती सांगून शासकीय निधी मंजूर करण्याची विनंती केली. आमदार पाटील यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत निधीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तर उद्योगपती अनिल पोतदार यांनीही वैयक्तिकरित्या शाळेच्या कामासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे जाहीर केले.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत धुडूम, माजी ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे, उमेश चौगुले, अशोक घुगरेटकर, कल्लाप्पा चौगुले, अनिल पावशे, नागेश पाटील, गणपती सुतार, बाळू दुर्गाराम पाटील, महेश पाटील यांच्यासह अलतगे गावातील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.




