बेळगाव लाईव्ह:अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने येत्या रविवार दि. 24 मे 2026 रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे आयोजित 7 व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे भूषविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव जिल्हा शाखेच्या बैठकीत ते बोलत होते. यंदाचे संमेलन साहित्य रसिकांसाठी पर्वणी ठरणार असून संमेलनाध्यक्ष पाटणे यांच्या व्यतिरिक्त प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत गोसावी व मुंबईचे लोककवी प्रशांत मोरे उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र मारूती पाटील यांनी दिली.
संमेलन कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असणार आहे. पहिले सत्र : संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे याचे अध्यक्षीय भाषण. दुसरे सत्र : पुण्याचे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे ‘छत्रपती शिवराय : आजच्या काळाची गरज’ या विषयावर ओजस्वी व्याख्यान. तिसरे सत्र : मुंबईचे लोकप्रिय लोककवी प्रशांत मोरे यांची ‘काळजातल्या कविता – आई व बाप’ या विषयावर हृदयस्पर्शी गेयता काव्य मैफल.
संमेलन निटनेटके व यशस्वी करण्यासाठी नियोजन व जबाबदारीचे वाटप करण्यात आले असून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे, असे उपाध्यक्ष डी. बी. पाटील यांनी सांगितले.
बैठकीस उपाध्यक्ष डी. बी. पाटील, शिवसंत संजय मोरे, एम. वाय. घाडी, रणजीत चौगुले, एम. के. पाटील, मोहन अष्टेकर तसेच महिला जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे-पाटील, स्मिता किल्लेकर, सविता वेसणे, रोशनी हुंद्रे आदी कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सीमाभागातील मराठी ‘ साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साहित्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
साहित्यसेवेचा आधारवड डॉ. शरद गोरे यांची ७ व्या बेळगाव साहित्य संमेलनाला सन्मानीय उपस्थिती राहणार
३२ वर्षांत १९६ संमेलनांचा विक्रम, हजारो नवोदितांना घडवले
बेळगाव : मराठी साहित्याच्या क्षितिजावर अखंड तेवणारा तारा, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद मधुकर गोरे, येत्या २४ मे २०२६ रोजी होणाऱ्या ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाला सन्मानीय उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत . अशी माहिती परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र मारूती पाटील यांनी दिली. ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास लोकनेते अजितदादा पवार असे नाव देण्यात आले आहे,श्री गोरे यांनी लेखक दिग्दर्शक व संगीतकार,अभिनेता म्हणून ६ मराठी चित्रपट केले आहेत, त्यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या मराठी चित्रपटासास कान्स व बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाले आहेत,
एक तपस्वी, एक चळवळ
१९९३ साली पुण्यातून सुरू झालेला हा साहित्य यज्ञ आज ९ राज्यांत ४६६ शाखा आणि २० हजार सभासदांपर्यंत पोहोचला आहे. डॉ. गोरे यांच्या दूरदृष्टीमुळे केवळ शहरातच नव्हे, तर खेड्यापाड्यातील बोलीभाषेला, नवोदितांच्या कवितेला आणि ग्रामीण अनुभवांना राष्ट्रीय विचारपीठ
मिळाले.
१९६ संमेलने, एक इतिहास
गेल्या तीन दशकांत डॉ. गोरे यांनी १९६ साहित्य संमेलने यशस्वी केली. त्यात ३२ नवोदित, २० ग्रामीण, १९ महात्मा फुले प्रबोधन, १८ छत्रपती संभाजी महाराज, १४ उत्तर महाराष्ट्र ग्रामीण, ८ युवा, ७ छत्रपती शिवाजी महाराज, ६ अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनांचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ, ग. दि. मा., नारायण सुर्वे, गाडगेबाबा यांच्या नावाने संमेलने घेऊन त्यांनी महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवले. मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन घेऊन मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकवला.
बेळगावशी ऋणानुबंध
सीमाभागातील मराठी अस्मितेचा हुंकार बुलंद करण्यासाठी परिषदेने बेळगावात यापूर्वी सहा संमेलने घेतली. यंदाचे सातवे संमेलन अधिक व्यापक व दर्जेदार व्हावे यासाठी डॉ. गोरे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत.
“साहित्य हे फक्त वाचायचे नसते, जगायचे असते. ग्रामीण भागातील शेवटच्या माणसाची व्यथा कागदावर आली पाहिजे,” हा डॉ. गोरे यांचा मंत्र आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे बेळगावच्या साहित्य संमेलनाला वैचारिक उंची मिळेल, असा विश्वास सीमाकवी रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला.
२४ मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, मराठा मंदिर येथे हा साहित्य सोहळा रंगणार असून सीमाभागातील हजारो साहित्यप्रेमी डॉ. गोरे यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.




