belgaum

शिवम असोसिएट्स प्रकरण:₹4,600 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप

0
178
 belgaum

 belgaum


बेळगाव लाईव्ह : हजारो कोटी रुपयांच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि पोंझी पद्धतीच्या गुंतवणूक योजनेप्रकरणी शिवानंद नीलण्णवर यांच्या मालकीच्या ‘शिवम असोसिएट्स’विरोधातील कारवाईला नवे वळण मिळाले असून, स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी रात्री शिवानंद नीलण्णवर यांना अटक केली आहे.


दिवसभर प्राथमिक चौकशी पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत रात्री सुमारे 10.30 वाजता शिवबसव नगर येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयासमोर हजर करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.


यापूर्वी गुरुवारी संध्याकाळपासून तब्बल 12 तास चाललेल्या धाड आणि शोधमोहीमेत बेळगाव उपविभागीय अधिकारी (एसी) श्रवण नाईक, सहकार विभाग तसेच पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईदरम्यान आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

 belgaum

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या निर्देशानुसार कर्नाटक गुंतवणूकदार हितसंरक्षण कायदा (KPID Act-2004) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. राज्याचे KPID नोडल अधिकारी अम्लान आदित्य बिस्वास यांच्या सूचनेनुसार संयुक्त पथकाने ही धाड टाकली होती.


प्राथमिक चौकशीत राज्यातील विविध भागांतील सुमारे 45 हजार गुंतवणूकदारांकडून पिरॅमिड पद्धतीच्या योजनेद्वारे तब्बल ₹4,600 कोटी जमा केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शिवम असोसिएट्सच्या दोन कार्यालयांसह एका अपार्टमेंट फ्लॅटचीही तपासणी करण्यात आली.


सूत्रांच्या माहितीनुसार, एसी श्रवण नाईक यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सविस्तर अहवाल सादर केला असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


याआधी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या प्रकरणात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली.


तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, कोविड काळात ही योजना सुरू करण्यात आली होती. काही वर्षांतच हजारो कोटी रुपयांचे आर्थिक जाळे उभे करण्यात आल्याचा संशय आहे. अधिक सदस्य जोडणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कमिशन देण्यात येत असल्याचाही आरोप आहे.


दरम्यान, जमा झालेला निधी आयात-निर्यात, रिअल इस्टेट आणि कमोडिटी व्यवसायासह विविध क्षेत्रांत गुंतवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.


या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना धीर देण्यासाठी शिवानंद नीलण्णवर यांनी एक ऑडिओ संदेश जारी केला होता. त्यामध्ये, “आणखी दोन-तीन दिवसांत सर्व काही सुरळीत होईल. कुणीही घाबरू नये. आमचा व्यवसाय सुरूच राहील,” असे त्यांनी म्हटले होते.


 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.