बेळगाव लाईव्ह : जुने बेळगाव येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ३३ च्या आवारात असलेली पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही टाकी पाडण्याचे आदेश देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जुने बेळगाव परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी १९९६ मध्ये ही टाकी उभारण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून या टाकीचा वापर बंद असून ती पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे. एल अँड टी कंपनीने या टाकीवर नादुरुस्त असल्याचे मार्किंगही केले आहे.
ही टाकी शाळेच्या अगदी जवळ असल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिकेला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही.
शाळेच्या आवारातील या समस्येबाबत बोलताना स्थानिक रहिवाशांनी प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढले आहेत. “शाळेसाठी ही टाकी मोठा धोका ठरत आहे. १९९६ मध्ये ग्रामस्थांनी जागा देऊन ही टाकी उभारली होती, मात्र आता ती कुचकामी ठरली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. येत्या आठ दिवसांत ही टाकी हटवली नाही, तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन ती पाडू आणि तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
दुसऱ्या एका प्रतिक्रियेत नागरिकांनी कर्नाटक अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरच्या सर्वेक्षणाचा दाखला दिला आहे. “नागरिकांच्या सोयीसाठी बांधलेली ही टाकी आता मृत्यूचा सापळा बनली आहे. सहा महिन्यांपूर्वीच कर्नाटक अर्बन डेव्हलपमेंटच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून टाकी पाडण्याचे आदेश दिले होते.
मात्र, या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. जर येत्या आठ दिवसांत ही टाकी पाडली नाही, तर जुने बेळगावमधील नागरिक रस्त्यावर उतरतील आणि या दरम्यान होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असेल,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.





