बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील शिवम असोसिएट्सने केलेला ४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा हा शहराच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे. निष्पाप नागरिक आणि माजी सैनिकांची मोठी फसवणूक टाळण्यासाठी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपण्णावर यांनी केली आहे.
शिवम असोसिएट्स ही कोणतीही अधिकृत कंपनी किंवा वित्तीय संस्था नाही. आरबीआय किंवा सेबीचा परवाना नसतानाही जनतेकडून पैसे गोळा करून शेअर्समध्ये गुंतवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यापूर्वी घोटाळा झाल्यानंतर प्रशासन जागे व्हायचे, मात्र यावेळी जिल्हा प्रशासनाने फसवणूक होण्यापूर्वीच कारवाई केल्याबद्दल राजकुमार टोपण्णावर यांनी समाधान व्यक्त केले.
शिवम असोसिएट्सकडून फसवणूक झालेले गुंतवणूकदार सध्या दहशतीखाली असून तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने स्वतःहून गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, जेणेकरून गुंतवणूकदारांना धीर मिळेल. अशा बनावट योजनांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन राजकुमार टोपण्णावर यांनी केले.
शहरात सध्या ‘सिटी इंडेक्स’ आणि ‘आदित्य राज कॅपिटल’ या कंपन्याही मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेत आहेत. शिवम असोसिएट्स ३.५ टक्के व्याज देत होती, तर आदित्य राज कॅपिटल्स ५ टक्के व्याज देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने या दोन्ही कंपन्यांची तातडीने चौकशी करून पुढील अनर्थ टाळावा, अशी मागणी राजकुमार टोपण्णावर यांनी केली आहे.






