बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये श्रद्धेचा गैरवापर करून माजी सैनिकांना गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढले जात असल्याचा खळबळजनक दावा राजकुमार टोपण्णावर यांनी केला आहे. माजी सैनिकांनी अशा फसव्या कंपन्यांपासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
भगवान शिव यांच्या नावाचा वापर करून लोकांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांना गुंतवणुकीकडे वळवायचे, हा श्रद्धेचा प्रकार नसून तिचा गैरवापर आहे, असे राजकुमार टोपण्णावर यांनी म्हटले आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या माजी सैनिकांना अशा प्रकारे लक्ष्य केले जात असून, त्यांची आयुष्यभराची पुंजी धोक्यात असल्याचे त्यांनी नमूद केले.
बेळगावमध्ये सध्या अशा स्वरूपाच्या तीन कंपन्या कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्या माजी सैनिकांच्या त्यागाचा आम्ही आदर करतो. मात्र, अशा गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका. कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित कंपनीची पूर्ण पडताळणी करा आणि सतर्क राहा, अशा शब्दांत राजकुमार टोपण्णावर यांनी माजी सैनिकांना सावध केले आहे.





