belgaum

हरीनामाच्या गजरात बाळेकुंद्री दुमदुमले

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: जाधव परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नामसंकीर्तन सोहळा हरीनामाच्या अखंड गजरात आणि अपूर्व उत्साहात संपन्न झाला. मुसळधार पावसाची पर्वा न करता हजारो वारकरी आणि भाविकांनी उपस्थिती लावत सोहळ्याला भक्तिमय स्वरूप प्राप्त करून दिले.

सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर यांचे अभंगगायन. त्यांच्या अभंगांनी वातावरण भारावून गेले, तर टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी देहभान विसरून हरीनामाच्या गजरात नाचत होते. फुगड्या, विविध पारंपरिक नृत्यप्रकार आणि रथाचा देखावा यामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक वैभव लाभले.

प्रतीपंढरपूरचा आकर्षक देखावा, विद्युत रोषणाई, फुलांच्या रांगोळ्या आणि फटक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला. प्रवेशद्वारावर पांढरी टोपी, भगवी शाल आणि टिळा लावून भाविकांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित वारकऱ्यांचा सन्मान युवराज जाधव आणि ह.भ.प. शिवराज जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

 belgaum

कार्यक्रमाच्या अखेरीस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच या धार्मिक सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘रील मेकिंग’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम घडवून आणला.

बाळेकुंद्री, सांबरा, निलजी, मुतगा, उचगाव, सुळगा, किणये, मुचंडी आदी परिसरातून मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. भर पावसातही भक्तिभाव, उत्साह आणि सामुदायिक सहभाग यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाल्याने हा नामसंकीर्तन सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.

८० हून अधिक जणांची ‘रील’ स्पर्धेत सहभाग धार्मिक कार्यक्रमाचे आधुनिक माध्यमांद्वारे दस्तावेजीकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘रील’ स्पर्धेत ८० हून अधिक युवक-युवतींनी सहभाग घेतला. यामुळे पारंपरिक भक्ती आणि डिजिटल युगाचा अनोखा मेळ पाहायला मिळाला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.