बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात आज सायंकाळी वळीव पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या झळांनंतर आलेल्या या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.
दुपारनंतर अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांचा वेग मंदावला, तर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली. पावसामुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने पादचाऱ्यांची गैरसोय झाली.
या पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात मोठी धांदल उडाली. उघड्यावर माल मांडलेल्या व्यापाऱ्यांची आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पावसामुळे धावपळ झाली. काही वेळातच रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागल्याने सखल भागात पाणी साचले होते.
शहरातील मुख्य रस्ते जलमय झाल्याने सायंकाळच्या वेळी वाहतुकीचा वेग मंदावला होता.
अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले असले, तरी वाढत्या तापमानापासून सुटका झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पावसाच्या आगमनामुळे वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला आहे. कडक उन्हामुळे हैराण झालेल्या बेळगावकरांना या वळीव पावसामुळे सुखद दिलासा मिळाला असून, सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर अधूनमधून कायम होता. या पावसामुळे पिकांना फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.





