belgaum

राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जेडीएसचा मोर्चा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दुष्काळामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नसल्याचा आणि वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडत असल्याचा मुद्दा उपस्थित करत जेडीएसने बेळगावात राज्य सरकारविरोधात आंदोलन केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

दूध आणि दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती वाढत असताना जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आक्षेप आंदोलकांनी घेतला. चन्नम्मा चौकातून निघालेल्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयात सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर पीक नुकसानीबरोबरच पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नुकसानभरपाई आणि आवश्यक मदत देणे गरजेचे असताना सरकारकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप जेडीएस कार्यकर्त्यांनी केला.

 belgaum

महागाईचा भार सर्वसामान्यांवर पडत असून शेतकऱ्यांच्या समस्याही कायम आहेत. या दोन्ही आघाड्यांवर सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी आंदोलकांनी केली.

दूध आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण आणावे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि कृषी क्षेत्राला आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

या आंदोलनात जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, नासीर भागवान, प्रतापसिंह पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.