बेळगाव लाईव्ह :बेळगावमधील अमन नगर परिसरात जुन्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले असून, तीन तरुणांवर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे.
या घटनेत वली शेख, इमाम शेख आणि मजीद शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमन नगर मध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
जखमी तरुण आणि हल्लेखोर यांच्यात जुना वाद होता. याच रागातून काही जणांनी तलवारीसह येऊन तिघांवर हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर जखमींना तात्काळ बेळगावमधील बिम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, पसार झालेल्या संशयितांचा शोध घेतला जात आहे.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





