बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सामाजिक शांतता आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील नेत्यांना प्रशासनासोबत काम करण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हा अल्पसंख्याक समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
आजची तरुण पिढी समाजाचे भविष्य असून त्यांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे भूषण बोरसे यांनी म्हटले. सोशल मीडियाचा गैरवापर, अंमली पदार्थांचे सेवन आणि जुगारासारख्या सामाजिक समस्यांबाबत तरुणांमध्ये जनजागृती करण्याची गरज भूषण बोरसे यांनी व्यक्त केली.
शहरातील गुन्हेगारी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. अल्पसंख्याक नेत्यांनी या सामाजिक मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, अशी विनंती भूषण बोरसे यांनी केली.

या बैठकीला लुईस रॉड्रिग्स, नियाज सौदागर, शाहिद मेमन आणि परमिंदर भाटिया हे समिती सदस्य उपस्थित होते. तसेच पोलीस उपआयुक्त एन. व्ही. बरमणी आणि जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी विजयप्रकाश पुजेर यांनीही प्रशासकीय अनुभवातून महत्त्वाच्या सूचना मांडल्या.
शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवणे आणि मोहोल्ला कमिट्यांची स्थापना करणे यावर बैठकीत चर्चा झाली. अल्पसंख्याक समाजातील विविध घटकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन समिती सदस्यांनी दिले.




