बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि अल्पवयीन मुलांच्या वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक मोठी आणि कडक कारवाई केली आहे.
शहरात एक अल्पवयीन मुलगा अत्यंत बेजबाबदारपणे दुचाकी चालवत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच बेळगाव वाहतूक पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने तपासचक्रे फिरवून, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दुचाकीचा क्रमांक आणि तिच्या मालकाचा शोध यशस्वीरित्या लावला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ती दुचाकी जप्त केली आणि वाहन मालकाला (पालकांना) दुचाकीसह पोलीस ठाण्यात हजर केले.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर, अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देणे हा कायद्यानुसार अत्यंत गंभीर आणि कायदेशीररित्या दंडनीय गुन्हा आहे, याची जाणीव करून देत पोलिसांनी पालकांची चांगलीच कानउघाडणी केली आणि त्यांना कायदेशीर समज दिली.

या बेजबाबदार कृत्याबद्दल पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली वाहन मालकावर गुन्हा नोंदवून त्यांना कडक नोटीस बजावली. या प्रकरणाची दखल घेत माननीय न्यायालयाने आता संबंधित वाहन मालकाला तब्बल २५,०००/- रुपये एवढा मोठा आर्थिक दंड ठोठावला असून तो त्यांना न्यायालयात जमा करावा लागणार आहे.
अशा निष्काळजीपणामुळे मुलांच्या आणि रस्त्यावरील इतर नागरिकांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण होतो, त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या हातात कोणत्याही परिस्थितीमध्ये वाहने देऊ नयेत, अन्यथा अशाच प्रकारच्या कठोर कायदेशीर कारवाईला आणि मोठ्या दंडाला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशाराही वाहतूक पोलिसांनी या निमित्ताने नागरिकांना दिला आहे.




