बेळगाव लाईव्ह :
काळ बदलला, पिढ्या बदलल्या… अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन देश-विदेशात स्थायिक झाले; मात्र आपल्या बालपणाच्या आठवणी जपणाऱ्या कंग्राळी खुर्द येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेवरील प्रेम आजही तितकेच जिवंत आहे. याच भावनेतून शाळेची १०० वर्षांची गौरवशाली परंपरा साजरी करण्यासाठी माजी विद्यार्थी एकत्र येत असून, शनिवार दि. ३० आणि रविवार दि. ३१ मे २०२६ रोजी शाळेचा भव्य शतकोत्तर महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) येथील शाळा परिसरात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत संयोजक समितीचे अध्यक्ष, माजी मुख्याध्यापक व शाळेचे माजी विद्यार्थी टी. डी. पाटील यांनी सोहळ्याची माहिती दिली. यावेळी अनेक आजी-माजी विद्यार्थी भावनिक वातावरणात उपस्थित होते.
“या शाळेने आम्हाला घडवलं, आयुष्याला दिशा दिली. आज आम्ही कुठेही असलो तरी शाळेचं ऋण कधी फेडू शकत नाही. म्हणूनच शाळेच्या शतकोत्तर वर्षानिमित्त सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन हा अविस्मरणीय सोहळा साजरा करत आहेत,” अशा शब्दांत टी. डी. पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या दोन दिवसीय सोहळ्यासाठी बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि परदेशातूनही माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. अनेकांनी आपल्या बालपणीच्या वर्गखोल्या, मैदान, शिक्षक आणि मित्रांच्या आठवणी पुन्हा जगण्यासाठी येण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.
पहिल्या दिवसाची कार्यक्रमांची रूपरेषा
शनिवार दि. ३० मे रोजी सकाळी ७:३० वाजता ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यात भजनी मंडळे, लेझीम पथके, आजी-माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
त्यानंतर सकाळी १०:३० ते दुपारी २ वाजेपर्यंत उद्घाटन समारंभ होईल. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार जगदीश शेट्टर यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यानंतर साताऱ्याचे धनंजय पाटील यांचे “विद्यार्थी व पालकांचे आरोग्य आणि सर्वांगीण विकास” या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्रात “माझ्या यशात शाळेचा वाटा” या विषयावर माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन होईल. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता होणार आहे.
दुसऱ्या दिवशी सत्कार आणि आठवणींना उजाळा
रविवार दि. ३१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ८० वर्षांवरील ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थी आपल्या शाळेविषयीच्या आठवणी, भावना आणि मनोगत व्यक्त करणार आहेत. सायंकाळी ५:३० वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शतकभर ज्ञानदानाची परंपरा जपणाऱ्या या मराठी शाळेच्या शतकोत्तर सोहळ्यामुळे संपूर्ण कंग्राळी खुर्द गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा सोहळा केवळ कार्यक्रम नसून शाळा, शिक्षक आणि मातीतल्या नात्यांचा भावनिक पुनर्मिलाप ठरणार आहे.




