belgaum

पिस्तूलाचा धाक, जंगलात नेऊन मारहाण

0
Khanapur news
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
खानापूर तालुक्यातील बैलूर क्रॉसजवळ बेळगाव-चोर्ला मार्गावर चित्रपटाला साजेशी थरारक दरोड्याची घटना घडली असून, पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत पश्चिम बंगालमधील तीन सुवर्णकारांना लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४६/२०२६ नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत सात संशयित दरोडेखोरांना अटक केली आहे. या घटनेमुळे खानापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एस. के. इबादुल (वय ३४) हे आपल्या मित्रांसह रबियुल गाजी व अली हुसेन मंडल यांच्यासोबत २० मे रोजी संध्याकाळी गोव्याकडे कारने निघाले होते. सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास खानापूर तालुक्यातील बैलूर गाव हद्दीतील बैलूर क्रॉसजवळ त्यांच्या कारला दोन संशयित वाहनांनी अडविले.

यानंतर वाहनांमधून उतरलेल्या सात आरोपींनी तिघांनाही जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवून रस्त्यालगतच्या जंगल परिसरात नेले. आरोपींनी मारहाण करत पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. भीतीचे वातावरण निर्माण करून आरोपींनी तक्रारदारांकडील १ लाख २०० रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली.

 belgaum
Police logo

दरम्यान, संबंधित तिघे सुवर्णकार असल्याची माहिती आरोपींना मिळाल्यानंतर त्यांनी आणखी सोन्याची मागणी केली. आरोपींच्या धमकीमुळे रबियुल गाजी याला बेळगावातील शहापूर परिसरातील कार्यशाळेत नेण्यात आले. तेथून २०५ ग्रॅम सोन्याचे बिस्किट तसेच २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणण्यास त्याला भाग पाडण्यात आले.

या संपूर्ण प्रकारात आरोपींनी एकूण २२५ ग्रॅम सोने, अंदाजे ३० लाख रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम लंपास करून घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, हालचालींचा मागोवा आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रबिऊल रोहूल आमीन गाझी, अलीहुसेन कबीरुद्दीन मंडल, सादीक अब्दुल रेहमान तोरगल, विवेक चंद्रकांत पाटील, प्रशांत महादेव चव्हाण, नितीन राजाराम चव्हाण, दिगंबर नागेश पाटील आणि मयुर राजू घाडी यांचा समावेश आहे.

सर्व आरोपींविरुद्ध खानापूर पोलीस स्थानकात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीएसआय ए. ओ. निरंजनस्वामी यांनी गुन्हा नोंदविला असून, पोलीस निरीक्षक एल. एच. गौंडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

या धाडसी दरोड्याच्या घटनेमुळे खानापूर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.