belgaum

खादरवाडीतील ‘बक्कापाची वारी’ लढ्याला यश : एकजुटीने १८० एकर जमीन वाचली

0
2481
 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष :
खादरवाडी गावातील ‘बक्कापाची वारी’ या १८० एकर जमिनीच्या मालकी व वहिवाटीवरील साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून, गावातील शेतकरी आणि युवाशक्तीने मिळवलेला हा मोठा विजय मानला जात आहे. सातबारा उताऱ्यातून वगळण्यात आलेला “खादरवाडी गावचे शेतकरी सामायिक वहिवाटदार” हा उल्लेख पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याने गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला.

या निर्णयामुळे बेकायदेशीररीत्या सुरू असलेले खरेदी-विक्री व्यवहार आणि अतिक्रमणाचे प्रयत्न थांबले असून, गावची भूमी वाचवण्यात यश आले आहे. सोमवारी गावात गुलाल उधळून आणि एकमेकांचे अभिनंदन करून ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

साडेतीन वर्षांचा लढा अखेर फळाला

सदर प्रकरणात सातबारा उताऱ्यातील शेतकरी वहिवाटीचा उल्लेख काढून टाकण्यात आला होता. याचा फायदा घेत काहीजणांकडून जमिनीचे व्यवहार सुरू होते. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला.

 belgaum

राजेश पाटील आणि राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आकाश पाटील, रोहन देसाई, अरुण माळवी, लक्ष्मण पाटील, विशाल पाटील, लखन पिंगट, गुंडू देसाई यांच्यासह अनेक युवकांनी सातत्याने पाठपुरावा केला. आरटीआयच्या माध्यमातून माहिती गोळा करून प्रशासनासमोर मांडली.

प्रशासनाची दखल आणि चौकशी

जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदारांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. तपासात सातबारा उताऱ्यातील वहिवाटीचा उल्लेख बेकायदेशीररीत्या वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तो उल्लेख पुन्हा समाविष्ट करण्यात आला आणि त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.

“भूमिपुत्रांचा विजय” – गावकऱ्यांची भावना

या निर्णयामुळे आता बक्कापाची वारी जमिनीवर कोणताही व्यवहार गावकरी व शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय करता येणार नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या लढ्याला शेतकरी संघटना, स्थानिक कार्यकर्ते, तसेच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि इतर मान्यवरांचे सहकार्य लाभल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

समाधान

खादरवाडीतील हा संघर्ष केवळ जमिनीचा नव्हता, तर गावच्या अस्तित्वाचा आणि हक्काचा होता. एकजुटीने आणि कायदेशीर मार्गाने लढा दिल्यास न्याय मिळू शकतो, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे. “बक्कापाची वारी” वाचवून गावकऱ्यांनी आपल्या हक्काच्या भूमीवर पुन्हा शिक्कामोर्तब मिळवले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी भाषिकांना उद्देशून दिलेला संदेश — “तुमची भाषा आणि तुमची जमीन सोडू नका, तुमचं कोणीही काही बिघडवू शकणार नाही” — हा ठाकरे यांचा भूमिपुत्र आणि मराठी माणसाच्या संघर्षा बाबतीतला संदेश आज खादरवाडी गावच्या ग्रामस्थांच्या संघर्षाला तंतोतंत लागू पडतो.खादरवाडीतील भूमिपुत्रांनी आपल्या जमिनीच्या हक्कासाठी दिलेला लढा हा केवळ मालकीचा प्रश्न नसून स्वाभिमानाचा आहे. “आपली जमीन आणि आपली भाषा सोडू नका” हा संदेश त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवला आहे.याच जिद्दीमुळे खादरवाडीच्या ग्रामस्थांचे आणि विशेषतः युवकांच्या एकजुटीचे सीमा भागात सर्वत्र कौतुक होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.