बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील कपिलतीर्थ तलावाच्या ठिकाणी भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू होण्याच्या परवाच्या दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने सदर तलाव महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तात्काळ पार पाडून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी त्वरेने तलावाचा विकास साधावा, अशी विनंती तलावाच्या जमिनीचे मालक गोडसे परिवार आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रादेशिक आयुक्त के एम जानकी यांच्याकडे केली आहे.
कपिलतीर्थ तलाव असलेल्या जमिनीचे मालक गोडसे परिवार आणि स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त विनंतीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी प्रादेशिक आयुक्तांना सादर केले. यावेळी शुभम शेळके यांच्यासह उपस्थित प्रमुख मंडळींनी परवा कपिलतीर्थ येथे घडलेल्या दुर्घटनेची आणि त्याला कारणीभूत गोष्टींची माहिती प्रादेशिक आयुक्तांना दिली.
तसेच गोडसे परिवार आणि बेळगाव महापालिका यांच्यातील तलाव हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्याची आणि तलावाचा विकासाची विनंती केली. प्रादेशिक आयुक्त जानकी एम. यांनी निवेदनाचा स्वीकार करून चौकशी अंती योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शेळके यांच्या समवेत विकास कलघटगी, कपिल भोसले आदींसह गोडसे परिवार आणि कपिलतीर्थ तलाव परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रादेशिक आयुक्त कार्यालय आवारात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी सांगितले की, परवा कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या कपिलतीर्थ तलावाच्या ठिकाणी दोन बालकांचा मृत्यू होण्याची जी दुर्घटना घडली त्याला कोण जबाबदार? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.
कपिलतीर्थ तलावाची जागा ही गोडसे परिवाराच्या मालकीची खाजगी जागा असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व गोडसे परिवाराचे सदस्य आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यास आले होतो. मात्र जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. मागील वेळी गोडसे परिवार व महापालिका यांच्यातील सदर तलावाची हस्तांतरण प्रक्रिया रखडल्यामुळे तलावाचा विकास होऊ शकला नव्हता. तलावाचा विकास न झाल्यामुळेच परवाची दुर्घटना घडली आहे.

याची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी गोडसे परिवारासह स्थानिक नागरिकांनी दर्शवली आहे. तसेच तलाव हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात यावी. कपिल तीर्थ तलावाच्या बाबतीत कायमस्वरूपी शाश्वत तोडगा काढून भविष्यात पुन्हा त्या ठिकाणी दुर्घटना घडणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. आजपर्यंत कपिलतीर्थ तलावाच्या ठिकाणी अनेकांचे हकनाक बळी गेले आहेत.
याचा गांभीर्याने विचार प्रशासनाने करावा. आजपर्यंतच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच परवा दोन कोवळ्या मुलांचा जीव गेला आहे. स्थानिकांचे सहकार्य असूनही प्रशासन कमी पडत असेल तर जाब कोणाला विचारायचा? हा प्रश्न आहे. तेंव्हा प्रशासनाने संपूर्ण जबाबदारी स्वीकारून स्थानिक रहिवाशी आणि जागेच्या मालकांच्या सहकार्याने चला हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून कपिलतीर्थ तलावाचा युद्धपातळीवर विकास साधावा. त्या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवल्यास शहरातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल, असे शुभम शेळके यांनी स्पष्ट केले.




